स्वप्नांमधील गावा – आरंभ

कथा-कादंबरी हे लेखकाला पडलेलं स्वप्न असतं. लेखक आपल्या प्रतिभेने कथा, व्यक्तिरेखा आणि सभोवताल सजवतो, आणि त्या स्वप्नात रंग भरले जातात. चित्र पूर्ण होतं. शब्दांच्या माध्यमातून ते आपणा वाचकांपर्यंत पोहोचतं.

काही कथा-कादंब~या अंतराळात घडतात – स्थळनिरपेक्ष असतात. त्याचा सभोवतालाशी फारसा संबंध नसतो. गौरी देशपांडे, आशा बगे वगैरे नातेसंबंधपटूंच्या लेखनाबाबत हे प्रमुख्याने दिसून येईल. त्याउलट व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे आदींचं लेखन स्थळ-सापेक्ष असतं. त्या कथावास्तूचा विचार स्थळापासून फटकून करता येत नाही. अंतू बर्वाअसा का आहे, याला उत्तर आहे की तो कोकणी आहे. त्याच्या जडणघडणीत तत्कालीन कोकणाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा मोठा वाटा आहे. कथेचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक स्थिती माहीत पाहिजे. अमेरिकेतला काळे-गोरे संघर्ष माहीत नसेल, तर To Kill a Mockingbirdया महान कादंबरीचा आनंद घेता येणारच नाही.

म्हणूनच अनेक लेखकांच्या कथा-कादंब~यांत “गाव” हे जवळजवळ स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून येतं. तुंबाडचे खोतमधल्या तुंबाड-लिंबाड-तालुका या त्रयीला, ग. दि. मा. – व्यंकटेश या भावांच्या लेखनातल्या माणदेशाला स्वतःचे असे व्यक्तित्व आहे. सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून साकारलेलं गाव अक्षरशः जिवंत होऊन सामोरं येतं. कथा संपली तरी गाव मनात रेंगाळतं. कथेला तिचा शेवट असतो, पण गावगाडा अखंड आहे – तो गडगडतच रहातो.

स्वप्नांमधील गावाही मालिका अशाच मनात रेंगाळलेल्या गावांची आठवण आहे. लेखकाच्या स्वप्नातलं गाव. माझ्याही आठवणीत कुठेतरी अडकून बसलेलं.

आदित्य जयंत पानसे

 

[आगामी: ’लंपनचं गाव’]

Published in:  on December 21, 2008 at 5:53 am Leave a Comment